आंबोली, महाराष्ट्राचे हिल स्टेशन – Amboli, Hill Station of Maharashtra
पावसाळा सुरु झाला कि निसर्ग आपली मरगळ झटकून आपल्या सौंदर्याचे दर्शन घडवतो. या काळात हिरवीगर्द झाडी-झुडपे, खळखळत वाहणारे पाणी, या पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले धबधबे, धुक्याची चादर आणि काही वेळेस दिसणारे इंद्रधनुष्य या गोष्टींनी माणसाच्या मनाचा ताबा घेतला नाही तर नवल नाही. कोकणातील पडणारा पाऊस म्हणजे तुफान पाऊस…. नदी नाले भरून वाहू लागले कि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला छोटे-मोठे धबधबे दिसतील. तसे म्हटले तर कोकणावर निसर्गाची सर्वात जास्त नजरमेहेर झाली आहे असे वाटते. याच कोकणात समुद्रसपाटीपासून सहाशे नव्वद मीटर (६९० मीटर) उंचीवर असलेले आंबोलीचा परिसर हा पावसाळ्यात स्वर्गाहून कमी नसतो. येथे पडणारा पाऊस काही वेळेस चेरापुंजी पेक्षाही जास्त पडतो. आंबोली मध्ये तुम्हाला असंख्य छोटे मोठे धबधबे पाहावयास मिळतील. या सर्वात आंबोली येथील धबधबा खूप प्रसिद्ध आहे. जुलै महिन्यात भरपूर पाऊस झाला कि हा धबधबा ओसंडून वाहू लागतो. क्वचित काही वेळेस तो रौदरूप ही धारण करतो.
सह्याद्रीतील पावसाळा हा हिरवे गालीचे अवतरून, फेसाळणाऱ्या जलप्रपातांच्या आडून आणि सदैव धुक्याच्या आच्छादनाखाली लपून आंबोलीला जणू काही स्वर्गाचंच रुपडं बहाल करतो. आकाशातून मुक्तहस्ते कोसळणाऱ्या पावसात भटकत असताना, तुम्हाला ऊन-पावसाचा खेळ चाललेला दिसतो. धुक्याची चादर ओढून लपणाऱ्या सह्याद्रीच्या घाटरांगा आणि काही वेळात ती चादर नाहीशी होऊन दिसणारे निसर्गाचे अविस्मरणीय रूप पाहून आपण थक्क होतो. या पावसाळ्यात येथील जीवसृष्टी बघण्याची मजा काही औरच आहे. काही जण मुद्दाम रात्रीच्या गर्द काळोखात इथली जैवविविधता पाहण्यास येतात.
हिरण्यकेशी मंदिर : Hiranykeshi Temple
आंबोली बस स्थानकापासून साधारण ३ ते ४ किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण. हिरव्यागार वनराईने वेढलेल्या या परिसरात,भरपूर पर्यटक येत असल्याने वाहनतळाची सोया केली आहे. याच वाहनतळापासून समोर येणाऱ्या हिरण्यकेशीच्या प्रवाहावरील एक छोटा ब्रिज ओलांडत आपण पुढे येतो. मग पुढे नदी डाव्या हाताला ठेवत ५ मिनिटे चालत गेल्यास आपण हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाजवळ पोहोचतो. हिरण्यकेशी म्हणजे पार्वतीचेचं एक नाव आहे, आणि तिचेच मंदिर हिरण्यकेशीच्या स्वरूपात याठिकाणी आहे. तुम्ही मंदिराजवळ जाताच, तेथील शांत, आल्हाददायक वातावरण पाहून प्रसन्न वाटते आणि एका अध्यात्मिक शांतीचा अनुभव घेता येतो. हिरण्यकेशी मंदिर (Hiranykeshi Temple) छोटंसं असून लाल-पिवळ्या रंगात रंगवलेले आहे. मंदिराचं समोर असलेल्या पानाच्या टाकीतून गोमुखात पाणी पडेल अशी व्यवस्था केली गेली आहे. पावसाळ्यात हे मंदिर कमीत कमी २ फूट पाण्यात असते.
नांगरतास धबधबा : Nangartass Waterfall
आंबोलीतुन बेळगाव रस्त्यामार्गे गेल्यास ७-८ किलोमीटर अंतरावर एका छोट्या मंदिराच्या मागच्या बाजूला नांगरतास धबधबा (Nangartass Waterfall) आहे. काळ्या कातळाला कापत २०० फूट खाली पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह पाहून धडकीच भरते. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने सुरक्षित अंतरावरून हा धबधबा पाहण्यासाठी दोन रेलिंग्स बांधल्या आहेत. निसर्गाचे हे भव्य आणि रौद्र रूप पाहून एक अनामिक भीतीही दाटून येते.
कावळेसाद धबधबा – kavlesad Waterfall
आंबोलीला गेल्यावर कावळेसाद धबधबा (kavlesad Waterfall) पहिला नाही असा एक ही माणूस सापडणार नाही. तसे पहिले तर हे ठिकाण आंबोली पासून ७-८ किलोमीटर अंतरावरील येळे गावाच्या हद्दीत आहे. धबधब्याकडे जाताना तुम्हाला दोन्ही बाजूला उसाची शेती, तोरण झुडपे दिसतात. आंबोलीतील कावळेसाद धबधबा हा उलटया दिशेने वाहणारा असून पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.सह्याद्रीच्या या खोऱ्यातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कावळेसाद धबधब्यातुन पडणार पाणी हे दरीत खाली न जात वाऱ्याच्या वेगाने उलट्या दिशेने जाते. कावळेसाद पॉईंटला एका बाजूला सपाट मैदान आहे, तर दुसऱ्या बाजूला दीड ते दोन हजार फूट खोल दरी असल्याने याठिकाणी धुक्याचा नेहमीच लपंडाव पहायला मिळतो. वाऱ्याचा वेग जेव्हा जास्त असतो त्यावेळी, येथे दरीत भिरकावलेली कोणतीही वस्तु खाली न जाता परत वर येते.
People Also Read :- महाराष्ट्रातील 12 सर्वोत्तम मान्सून ट्रेक्स
आंबोली धबधबा : Amboli Waterfall
आंबोली ते सावंतवाडी या रस्त्यावर असलेला सर्वात मोठा धबधबा म्हणजेच आंबोली धबधबा (Amboli Waterfall) . हा धबधबा अगदीच रस्त्याला लागून आहे, त्यामुळे तिथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. आंबोलीच्या पर्यटनात हा धबधबा मुख्य आकर्षण आहे. १००-१५० फुटांवरून पडणाऱ्या पाण्यात पर्यटक मनोसक्त न्हाहून घेतात, मजा मस्ती करतात आणि तिथून बाहेर आल्यावर चहा-भाजी, भाजलेले कणीस याचा मन मुराद आनंदन घेतात.
आंबोली जंगलातील पर्यटन : Amboli Forest Tourism
आंबोली हे निसर्गप्रेमींसाठी खरंच नंदनवन आहे. तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तेथील गर्द घनदाट जंगलात फिरायलाच हवे. अंबोलीत ऐतिहासिक व समृद्ध बॉटॅनिकल गार्डनही आहे. आंबोलीच्या जंगलात फिरताना तुम्हाला विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजाती पाहावयास मिळतील. बेडूक, साप , फुलपाखरे, रक्त पिपासू जळवा असे प्राणी पक्षी तर जागोजागी पाहावयास मिळतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न- FAQ
आंबोली कोणत्या गोष्टी साठी प्रसिद्ध आहे? – Why Amboli is so Famous in tourists?
उत्तर: आंबोली हे हिलस्टेशन (Amboli hill station)असून आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील धबधबे, हिरण्यकेशी मंदिर, आल्हाददायक हवामान तसेच उत्कृष्ट मालवणी जेवणासाठी (Malwani Food) प्रसिद्ध आहे,
आंबोलीला फिरण्यास किती दिवस पुरतील?
उत्तर: आंबोलीतील प्रमुख आकर्षणे पाहण्यासाठी आणि येथील प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणात रमण्यासाठी २ ते ३ दिवस पुरेसे आहेत.
आंबोलीला जाण्यासाठी कोणता महिना सर्वोत्तम आहे? – Best Season to visit Amboli
उत्तर: तसे पहिले तर आंबोलीला वर्षभर पर्यटक येतात, परंतु सर्वात जास्त पर्यटक आंबोलीचे पावसाळ्यातील सौंदर्य पाहावयास येतात. आंबोलीला जाण्यासाठी जून ते सप्टेंबर हा पावसाळाचा काळ सर्वोत्तम मानला जातो.
आंबोलीत कुठे राहायचे? – Accomodation in Amboli
उत्तर:आंबोली हे हिलस्टेशन असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. तुमच्या बजेट नुसार तुम्हला येथे होमस्टे, गेस्टहॉउस, हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स मिळू शकतात. महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे गेस्टहॉउस ही चांगले असून तुम्हाला आगाऊ आरक्षण करावे लागेल. त्याच बरोबर सिल्वर स्प्रिंग रिसॉर्ट तसेच व्हिसलिंग वुड रिसॉर्ट्स ही उत्कृष्ट आहे.
आंबोलीला कसे जायचे ? – How To Reach Amboli?
उत्तर: जाण्याचा मार्ग : मुंबईपासून अंबोली घाटाचे अंतर सुमारे साडेपाचशे किलोमीटर आहे. मुंबईहून येथे बस व रेल्वेनेही पोहचता येते. सावंतवाडीहून अंबोली अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. कोकण रेल्वेने आपणांस सावंतवाडीस पोहचता येते. कोल्हापूरहून हे ठिकाण चार तासांच्या अंतरावर आहे.
Jaylach pahije Ambilila, mast nisarg varan